ठाणे, 2 मार्च 2017/AV News Bureau:
अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारताना किनवली पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली आहे. विलास विकास मैफतराव(29)आणि रमेश गोविंद नलावडे (31) अशी लाच मागणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या भावाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी विकास मैफतराव आणि रमेश नलावडे या किनवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 13 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याचे मान्य करीत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनुसार किनवली पोलीस ठाण्यासमोरील गुरुकृपा हॉटेलमध्ये सापळा रचून 8 हजार रुपये स्वीकारताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैशाली रासकर अधिक तपास करीत आहेत.