मुंबई, 2 मार्च 2017/AV News Bureau:
आयआयटी मुंबईच्या नागरी अभियांत्रिकी विभागातर्फे येत्या 4 आणि 5 मार्च रोजी दोन दिवसांच्या “आकार” या वार्षिक महोत्सवाचे, आयआयटी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.
“ आकार” महोत्सवात तंत्रज्ञान विषयक उदयोन्मुख सफलता या विषयाचा पाया घातला जातो. तसेच सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील नवनवीन आणि विविध पैलू शिकण्यासाठी तसेच निर्मिती करण्यासाठी गृहनिर्माण अभियंत्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते.
सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध व्हावी आणि संवाद साधता यावा यासाठी हे संयुक्त व्यासपीठ आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे, टंडन कन्स्लटंटचे कार्यकारी संचालक महेश टंडन, दक्षिण आशिया बीएएसएफ इंडिया लिमिटेडचे व्यवसाय संचालक निलोत्पल कार यांची 4 आणि 5 मार्चला व्याख्याने आणि कार्यशाळा होतील.
देशातील तल्लख अभियंत्यांशी स्पर्धा करण्यासाठी “आकार” हे नागरी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कामगिरीवर आधारित व्यासपीठ आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक सॉफ्टवेअर हाताळायला मिळण्याची संधी मिळते आणि विख्यात उद्योगपती आणि तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनही मिळते.