नवी मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महानगरपालिकेने NMMT Bus Tracker (एन.एम.एम.टी बस ट्रॅकर) हे प्रवाशांसाठी उपयुक्त असे मोबाइल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून एन.एम.एम.टी प्रवाशांचा प्रवास विनासायास सुलभ होणार आहे.
- अॅपचा उपयोग
या ॲपच्या माध्यमातून एन.एम.एम.टी प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. या ॲपव्दारे प्रवाशांना जवळचा बस थांबा कोठे याची माहिती उपलब्ध होणार असून ज्या ठिकाणाहून बसप्रवास सुरु करावयाचा आहे त्या ठिकाणाहून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती तसेच कोणती बस किती वेळानंतर त्या बस स्टॉपवर येईल याची माहिती एका क्लिकमध्ये कळणार आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार असून त्यामुळे त्यांना आपल्या वेळेचेही नियोजन सहज करता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज पत्रकारांना दिली.
- बसस्थानकांवर एल.इ.डी. डिस्प्ले
हे ॲप प्रवाशांना Multimodal Transport (रेल्वे, मेट्रो, बस) चा वापर करण्यास उपयुक्त ठरणार आहे. बसचे वेळापत्रक व बस थांब्यावर येणारी बस कोणत्या बस थांब्यावर आहे याची माहितीही या ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने सर्व बस स्थानकांवर 81 ठिकाणी एल.इ.डी. डिस्प्ले लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर बसच्या येण्याच्या वेळेची माहिती उपलब्ध होणार आहे. लवकरच प्रवासाकरीता डिजीटल टिकीटिंग आणि स्मार्ट कार्डचा वापर करण्याची सुविधा या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल असे मुंडे यांनी सांगितले.
- बेलापुर भवनात नियंत्रण कक्ष
या सेवेसाठी आय.आय.टी.एस. (Intelligent Intigrated Transport System) प्रणाली प्रभावीपणे राबविण्याकरीता सी.बी.डी. बेलापूर येथील बेलापूर भवनात आठव्या मजल्यावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून या ठिकाणाहून बसेसचे प्रवासी मार्ग, त्यांचा वेग, त्यांची स्थानके अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.