कोस्टल रोडला महिन्याभरात परवानगी

coastal road

मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:

मुंबईच्या कोस्टल रोडसंदर्भातील सीआरझेडची अंतिम मंजुरीचा मसूदा पर्यावरण मंत्रालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार मसुदा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत त्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यावरण मंत्रालयाने दिले आहे. यामुळे मुंबईच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडची निविदा प्रसिद्ध करुन तात्काळ काम सुरू करता येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिल्ली येथील दौऱ्यात केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी झुडपी जंगलाच्या प्रश्नासंदर्भातही चर्चा झाली. सुमारे 50 हजार हेक्टरवरील झुडपी जंगलासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे सूतोवाच दवे यांनी केले. मुंबईमधील मालाड आणि इतर ठिकाणचे प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि त्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणित निकष यासंदर्भात महिनाभरात निर्णय अपेक्षित आहे. तसेच सीआरझेड क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत सात ते आठ वर्षापूर्वी 51 टक्के आणि 49 टक्के असे सूत्र सरकारने निश्चित केले होते. हे सूत्र व्यवहार्य नसल्याने त्यानुसार एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यासंदर्भात नाईक समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा. त्यामुळे लोकांना लवकर घरे देता येणे शक्य होईल, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. या विनंतीनुसार येत्या चार तारखेला बैठक घेण्याचे ठरले आहे. राज्याकडून मांडण्यात आलेल्या पर्यावरणासंदर्भातील सुमारे 17 विषय मार्गी लागले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळ, नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालय, बंदरे यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली.