वार्तांकन करणा-या पत्रकारांना मारहाण
नवी मुंबई,२८ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
दिघा येथील चार इमारती खाली करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आज अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या चार इमारती करून कोर्ट रिसिव्हनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.दरम्यान, या कारवाईचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना स्थानिक नागरिकांकडून मारहाण करण्याची घटना घडली आहे.
दिघ्यातील सिडकोच्या जमिनीवर असलेल्या अमृतधाम, अवधूत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या चार इमारतींना जागा खाली करण्याची नोटीस सप्टेंबर 2016 मध्ये पाठवण्यात आली होती. या कारवाईला स्थगिती मिळावी, म्हणून या चारही इमारतीतील रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने रहिवाशांची याचिका फेटाळून लावत, इमारती खाली करून कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.
हायकोर्टाने यापूर्वीच दिघ्यातील सिडको आणि एमआयडीसीच्या भूखंडावरील 99 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या कारवाईविरोधात दिघ्यातील रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण हा विषय शासनाचा असून याबद्दलचा निर्णयही शासनाने घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दिघ्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरु राहणार आहे.
- दिघ्यात पत्रकारांना मारहाण
दिघा येथे या कारवाईचे वृत्तसंकलन करणा-या झी चोवीस तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि कॅमेरामन संदीप भारती यांना मारहाण करण्यात आली. भारती यांना गंभीर दुखापत झाली असून नाईक यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोषांविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
- दिघावासियांचा रोष
दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू असताना स्थानिकांनी हार्बर मार्ग रोखून धरला होता. दिघ्यातील आंदोलनकर्त्यांकडून वारंवार होणा-या या आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही फटकारले होते. शिवाय, आंदोलनासाठी दिघावासियांना चिथावणाऱ्या राजकीय नेत्यांची नावेही हायकोर्टाने मागवली होती. यासंदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेशही हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.