नवी मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष गटात विहंग आणि महिला गटता शिवभक्त संघांनी विजेतेपद पकावले आहे.
या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील गाजलेल्या खेळाडूंचा समावेश असलेले पुरुषांचे 12 व महिलांचे 12 नामांकीत संघ सहभागी झाले होते.
- पुरुष गट
पुरुष गटात विहंग क्रीडा मंडळ यांनी ग्रिफीन जिमखाना यांच्याशी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांच्यावर एका गुणाने मात करीत विजेते पदाचा नवी मुंबई महापौर चषक (पुरुष गट) पटकाविला. महात्मा गांधी स्पोर्टस् क्लब मुंबई उपनगर हा संघ तृतीय तसेच स्व.अरूणभैय्या नायकवडी युवा मंच वाळवा सांगली हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. विहंग क्रीडा मंडळाच्या प्रदिप जाधव यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हा बहुमान लाभला तसेच विहंग क्रीडा मंडळाचेच गजानन शेंगाळ सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू आणि ग्रिफीन जिमखान्याचे निखील वाघे सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.
- महिला गट
महिला गटात शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर ठाणे यांनी रा.फ.नाईक कोपरखैरणे नवी मुंबई यांच्यावर मात करीत विजेते पदाचा नवी मुंबई महापौर चषक (महिला गट) संपादन केला. छत्रपती क्रीडा मंडळ उस्मानाबाद हा संघ तृतीय तसेच आर्यन स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर ठाणे या संघातील रेश्मा राठोड हिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हा बहुमान लाभला तसेच रा.फ.नाईक कोपरखैरणे यांच्या संघातील प्रणाली मगर ही सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू आणि शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर ठाणे संघातील प्रियंका भोपी ही सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली.
- सर्वोत्कृष्ठ खेळाडू
दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी 24 फेब्रुवारीला पुरुष गटात महात्मा गांधी स्पोर्टस् असोसिएशन मुंबई उपनगरचा खेळाडू सौरभ चव्हाण तसेच महिला गटात आर्यन स्पोर्टस् क्लब रत्नागिरीची खेळाडू तन्वी कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 25 फेब्रुवारीला पुरुष गटात श्री सह्याद्री संघ मुंबई उपनगरचा खेळाडू दुर्वेश साळुंखे आणि महिला गटात छत्रपती क्रीडा मंडळ उस्मानाबादची खेळाडू ऋतुजा खरे ही दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.