शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणार

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 27 फेब्रुवारी 2017, AV News Bureau

शेतकरी कर्जमाफी व शेतीमालाचे दर आदी मुद्द्यांवर राज्य विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचे विधानसभा  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या  बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी व तातडीचा उपाय असलेल्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी असणार आहे.

शेतीमालाला पुरेसा भाव मिळाला नाही. शासकीय खरेदीची पुरेशी यंत्रणा उभी करण्यात आली नाही. यंदा शेतकऱ्यांना तुरीचे चांगले उत्पादन मिळाले. परंतु, सरकारने अचानक तूर खरेदी बंद केली. त्यामुळे तुरीचे भाव घसरले आहेत. सरकारने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. या मुद्यावर विधीमंडळात सरकारला घेरणार असल्याचे सूतोवाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.