मुंबई, 26 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईत लवकरच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तर राज्यातील साधारणपणे 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
- मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज
राज्यात शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार आहे. सध्या दोन्ही पक्षांची युती तुटली आहे. तसेच राज्यातील सर्व निवडणुकाही स्वतंत्रपणे लढले आहेत. निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वर्तन पाहता ते राज्यातील सत्तेतून बाहेर पडणार नाही. मात्र मध्यावधी निवडणुक लागलूच तर राष्ट्रवादी काँग्रस सज्ज आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
- मुंबईत भाजप वगळता इतरांना पाठिंबा देणार
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दोन जागांचाच फरक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची संधी आहे. मात्र पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांना अपक्ष तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, मुंबईत भाजप वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत आपला पक्ष विचार करील, असे पवार यांनी सांगितले.
मुंबईत भाजपचे 82, तर शिवसेनेचे 84 उमेदवार निवडून आले आहेत. तसेच चार अपक्षांचा पाठिंबा मिळाल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 88च्या घरात पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महत्वाची भूमिका बजावू शकतात,असे जाणकारांचे म्हणणे आहे.