UPDATE : मतदान झाले, 23 फेब्रुवारीला निकाल

vote

10 महापालिकांसाठी सरासरी 56 % मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69% मतदान

मुंबई, 21 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडले. महापालिकांसाठी सरासरी 56 टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी सरासरी 69 टक्के मतदान झाले. तब्बल ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदारांनी १७ हजार ३३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले . मतदानासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरीही अनेक ठिकाणी तणावाच्या घटना घडल्या. मुंबईत विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये निकालाबाबत धाकधूक वाढली आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी मतदारांचा फेवरेट कोण हे जाहीर होईल.

आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. तर गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्यांतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.  यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के मतदान तर  वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते, अशी माहिती मुख्य  निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज दिली.

  • राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीत झालेले मतदान

mahapalika

पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदनिहाय झालेले मतदान

zp

यवतमाळ आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या जागांसाठी न्यायालयीन प्रकरणांमुळे  पहिल्या टप्प्यातील मतदान घेण्यात आले नव्हते. मात्र  तेथेही आज मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीनपर्यंत यवतमाळमध्ये  सुमारे 70 टक्के तर वर्धा  येथे अंदाजे 56 टक्के मतदान झाले.

 कोल्हापूर येथे पन्हाळा तालुक्यातील  कुशिरे येथे मतदान केंद्रावर तैनात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील कोंड असूर्डे येथे पुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकल्याचे समजते. 389 मतदारांपैकी केवळ 11 जणांनी मतदान केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रत्नागिरी आणि सोलापूर येथे मतदान करायला निघालेल्या एकेका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • शरद पवारांचे मत कोणाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत मतदान केले. मात्र पवार यांनी कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोरील बटन दाबले याचीच चर्चा दिवसभर रंगली.

शरद पवार आज सकाळी आपल्या नातीसह मतदानासाठी घराबाहेर पडले होते. शरद पवार यांचे नाव प्रभाग क्रमांक 214 मध्ये नाव आहे. मात्र त्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा नव्हता. त्यामुळे पवार जेवहा मतदान करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी नेमके कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. याबाबत कुजबूज सुरू झाली.

  • मुंबईत मतदारांची नावे गायब

सगळ्यांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आता वेगळाच वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे. सकाळी मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांची नावेच मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विधानसभेसाठी मतदान केले परंतु आता महापालिका निवडणुकीत मतदार यादीतून नावच गायब झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मानखूर्द, कफ परेड, दादर, सायन,कुर्ला आदी भागांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकाची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्याचा परिणाम मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले आहे.

  • अमिर खान अडचणीत?

पारदर्शक कारभार आणि सुशासनासाठी मतदान करण्याचं आवाहन अभिनेता अमिर खान करीत असल्याच्या वर्तमान पत्रांमधल्या जाहीरांतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या दिवशीच अशाप्रकारे जाहीरात म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तर याप्रकरणी कोणी तक्रार केली तरच त्यामध्ये लक्ष घातले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

  • ठाण्यात माजी नगरसेवकाला मारहाण

पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शाहजी जावीर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • उल्हासनगरमध्ये हाणामारी

उल्हासनगर महापालिकेच्या 78 जागांसाठी आज मतदान झाले. वीस प्रभागांसाठी एकूण 479 उमेदवार निवडणूक लढवत होते. माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाडीवर झालेली दगडफेक केल्याचा प्रकार घडला. तर भाजप आणि साई पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्येही मारामारी झाल्याचे वृत्त आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सेल्फी, मालमत्ता करात सूट, पुढील तीन दिवस हॉटेलच्या बिलांमध्ये सूट असे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते.