वर्षभरात 80 हजारांहून अधिक कारवाया, 75 लाखांचा दंड वसूल
महापालिकेच्या कारवाईविरोधात लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना
नवी मुंबई,19 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त यांचा विरोध झिडकारत नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, झोपड्या, मंदिरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा बुलडोझर सुस्साट फिरू लागला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 80 हजार 839 कारवाया करून दंडापोटी 75 लाख रुपयांची वसूलीदेखील करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 नंतरच्या बांधकामांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि लोकप्रतिनिधी यांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे.
बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या विभागांमध्ये अतिक्रमण विभागातर्फे 1जानेवारी 2015 ते 31डिसेंबर 2016 या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तपशिल पुढीलप्रमाणे –
गुन्हे दाखल
होर्डिंग्ज आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कायदेशीर कारवाई करीत गुन्हेही दाखल केले आहेत. यामध्ये बॅनरबाजी करणाऱ्या 20 तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या 78 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
- अधिका-यांवर कारवाई करा – सुधाकर सोनवणे
अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई होते, असे प्रशासन सांगते. या गोष्टीला आमचा विरोध नाही आणि अनधिकृत बांधकामांचे समर्थनही करीत नाही. मात्र जेव्हा प्रशासनाची परवानगी न घेताच बांधकाम सुरू होते, तेव्हाच ती का तोडून टाकली जात नाही. नागरिक रहायला आल्यानंतर बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून गोरगरीबांचे संसार उघड्यावर आणायचे, याचे कोण समर्थन करील? उलट बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या भूमाफिया, बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई व्हायला हवी.
सुधाकर सोनवणे, महापौर- नवी मुंबई
- नियमानुसारच कारवाई
अतिक्रमण विभाग कायद्याच्या चौकटीत राहून काम करीत आहे. ज्या ठिकाणी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता बांधकाम अथवा काम केले असेल तर संबंधितांना नोटीस बजावून ते स्वतः निष्काषित करण्यास सांगितले जाते. अतिक्रमण विभाग नियमानुसार कारवाई करतो.
डॉ.कैलास गायकवाड, उपायुक्त –अतिक्रमण विभाग, नवी मुंबई महापालिका