राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
मुंबई,18 फेब्रुवारी 2017/A News Bureau:
शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा अथवा शिवसेनेला आपला पाठिंबा देणार नाही, तसे राज्यपालांनाही लिहून देण्यास आपण तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपा सरकारला पाठिंबा देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीप्रमाणे लिहून देण्याची तयारी दाखवावी, असे आवाहनही पवार यांनी केले. यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ.हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड कास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये ज्या पध्दतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. परंतु एकीकडे शिवसेना सरकार मधून बाहेर पडण्याची भाषा करीत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत ज्या प्रकारे भाजपाने तेथील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे, तशी कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी करण्याची घोषणा केली तर राज्यातील भाजपा सरकार पाच वर्ष चालू शकते. त्यामुळे आता भाजपाला राज्यातील सरकार वाचवायचे असेल तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील सरकार घालविण्यापेक्षा, पुन्हा निवडणुकीवर आणि जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे केंव्हाही चांगले असा टोला पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.
- राज्यातील वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात
राज्यात महापालिकांसोबत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीचा अंदाज पाहता व सरकारच्या धोरणा विरोधात जनतेची नाराजी पाहता राज्यातील जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता कौल देईल असे वातावरण असल्याचे खा.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.