काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई, 18 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पुण्यातील सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याने त्यांना सभा रद्द करावी लागली. वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते. हे भाजपविरूद्धचे हे बदलाचे वारे असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
पुण्यातील टिळकरोड परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी मुख्यमंत्री सभेसाठी दाखल झाले. परंतु १५ मिनिटे थांबून देखील मतदार सभेसाठी आलेच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ही सभा रद्द करून पुढील सभेसाठी जावे लागले. चुकीची वेळ आणि विसंवाद, यामुळे सभा रद्द करण्यात आल्याचे तकलादू कारण मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र देशातून आणि राज्यातून भाजपची हवा संपल्याचेच या घटनेवरून स्पष्ट झाले, असे चव्हाण म्हणाले.