नवी मुंबई, 17 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिकेतर्फे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत “नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा नेरूळ जिमखाना, सेक्टर 28, नेरूळ येथे संपन्न होत आहे.
महापौर सुधाकर सोनवणे यांच्याहस्ते उद्या या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी रात्री8 वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आणि इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा पुरुष व महिला खुल्या गटात होणार असून दोन्ही गटात स्मृतीचिन्हासह एकूण 2 लाख 22 हजार रुपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सिरिज व बेस्ट प्लेअर ऑफ फायनल यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूस मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाने म्हणून गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील नामांकीत व्हॉलीबॉल खेळाडूंचा खेळ क्रीडा रसिकांना अनुभवता येणार आहे.