खादी ग्रामोद्योग आयोग आणि तेल व नैसर्गिक वायू महामंडळात करार
मुंबई, 17 फेब्रुवारी 2017:
भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनएजीसीनं सक्रीय पुढाकार घेत खादी ग्रामोद्योगाबरोबर एक करार केला आहे. देशभरातील ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना रोख बोनस ऐवजी खादी उत्पादन पुरवण्याबाबत हा करार आहे.
खादी ग्रामद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी गुरुवारी मुंबईत ही माहिती दिली. देशभरात ओएनजीसीचे 35 हजार 299 कर्मचारी आहेत. या विशेष विक्री मोहिमेशी जोडल्या गेलेल्या कारागिरांच्या खात्यात अतिरिक्त 5 टक्के रक्कम थेट जमा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात ओएनजीसीचे 6 हजार 783 कर्मचारी असून त्यांच्याकरता 16 ते 28 फेब्रुवारीदरम्यान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे. खादी ग्रामोद्योगसाठी विक्री, कर्मचाऱ्यांसाठी पैशाचं योग्य मूल्य आणि ओएनजीसीसाठी कर्मचाऱ्यांची सदिच्छा, असा या मोहिमेचा तिहेरी लाभ होणार आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील कारागिरांच्या शाश्वत विकासाला मदत होणार आहे. उत्पादनातील वाढीबरोबरच ग्रामीण भागातील कारागिरांना अधिक उत्पन्न मिळेल. तसेच त्यांचं राहणीमान उंचावण्यात सहाय्य होईल.
खादी ग्रामोद्योग आयोग 16 विशेष प्रदर्शनाद्वारे उत्तम दर्जाची खादी उत्पादन उपलब्ध करून देणार आहेत. कर्मचाऱ्यांची मूलं आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणर असून विक्रीपैकी 80 ते 70 टक्के विक्री तयार कपड्यांची असेल याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे.