राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल

tatkare

महाराष्ट्र प्रदेशाध्यशक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

मुंबई,14 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

राज्यात निवडणुक  होत असलेल्या १० महापालिका,  २५ जिल्हा परिषदा तर  २९६ पंचायत समित्यांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवाती पासून कोणत्याही जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी न करता समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील विविध जिल्ह्यांत  काँग्रेस, शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षाशी आघाडी केली आहे.

  • जिल्हा परिषदेची निवडणूक

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापुर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली आदी जिल्हा परिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर रायगड, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड , लातूर, वर्धा आदी ठिकाणी काँग्रेस ,शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढवित आहे.

  • महापालिकांची निवडणूक

राज्यात निवडणुक होत असलेल्या १० महापालिकांपैकी मुंबई , सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड आदी महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुक लढत आहे. तर ठाणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण १३१ जागापैकी ११६ जागी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली आहे तर १५ जांगावर मैत्रीपुर्ण लढत होत आहे. पुणे महापालिकेसाठी एकूण १६२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५६ जागा व काँग्रेस ३० जागा तर ७६ ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत होत आहे. नाशिक  महापालिकेत १२२ जागांपैकी ६० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ४३ जागांवर काँग्रेस पक्ष लढत आहे. नागपूर मध्ये रिपाई सोबत आघाडी करुन लढत आहे.