मुंबई,14फेब्रुवारी 2017/AV News Bureau :
राज्यातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी 2017) ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. 11 मे 2017 रोजी ही सामाईक परीक्षा राज्यातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणार आहे.
- पाचशे रुपये विलंब शुल्क
ऑनलाईन पध्दतीने अर्ज 23 मार्च पर्यंत नियमित शुल्कासह www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. त्यानंतर 24 ते 30 मार्च 2017 या कालावधीत पाचशे रुपये अधिकचे विलंब शुल्क भरुन अर्ज भरता येतील.
राज्यातील अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र अभ्यासक्रमांचे (बी.ई./बी.टेक.) आणि औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म. व फार्म.डी.) या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) केले जातात.
परीक्षा अर्ज आणि माहिती पुस्तिका www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी कळविले आहे.