अर्थ समिक्षक संजीव चांदोरकर यांचे मत
ठाणे,१३ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा बंदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामागील खरा डाव भांडवली अर्थव्यवस्थेचा फायदा करून देणे असा असावा, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थ समिक्षक संजीव चांदोरकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित क्रांतिज्योति सावित्री बाई फुले व्याख्यान मालिकेच्या समारोप सत्रात “नोटाबंदीचा ताळेबंद” या विषयवार ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवक मंडळाचे अविनाश कोरडे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन केले.
“खरे तर सरकारने नोटा बंदी नव्हे तर नोटा बदल केला. एक हजारच्या जागी दोन हजाराच्या नोटा चलनात आणून सरकारने काय साधले ? या देशातील सुमारे ८५% जनता कॅश आधारित व्यवहार करीत असतांना त्या जनतेला कैशलेस व्यवहाराकडे जबरदस्तीने ढकलणे लोकशाहीत बसणारे ठरते का, असा सवालही संजीव चांदोरकर यांनी केला.
कैशलेस व्यवहारात प्रत्येक विनिमयाची किमत चुकवावी लागते. साधा डेबिट आणि क्रेडिट कार्ड यातील फरकही ठावूक नसणारी बहुसंख्य जनता या देशात असतांना आशा तथाकथित सुधारणांसाठी २०१६ चा मुहूर्त योग्य होता का,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सुनील दिवेकर यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास श्री समर्थ सेवक मंडळाचे उल्हास प्रधान, बँक कर्मचारी संघटनेचे विश्वास उटगी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लतिका सु मो, उमाकांत पावसकर, अविनाश कदम, अविनाश मोकाशी,अमेरिका स्थायी ठाणेकर श्री. माधव परांजपे, अक्षय ऊर्जा अभियानाच्या दीपा जोशी,श्री हर्षद कारखानीस, डॉ स्मिता कारखानीस आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आदि मान्यवर उपस्थित होते.