राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय
नवी मुंबई, 13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सिडकोतर्फे आज दुस-या टप्यातील निविदा प्रक्रिया काढण्यात आली. यावेळी जीएमआर, एमआयएएल (जीव्हीके) या दोन कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या आहेत. यामध्ये जीव्हीकेने सिडकोला 12.60 टक्के महसूल उत्पन्न देण्याचे मान्य केल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे.
या प्रकल्पाच्या पात्रता फेरीत जीएमआर, एमआयएएल (जीव्हीके), टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झुरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी आर्थिक निविदा सादर करण्यासाठी जीएमआर व एमआयएएल (जीव्हीके) या दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला. यावेळी कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा उघडण्यात आल्या. त्यात कंपनीतर्फे सिडकोला द्यावयाचा वार्षिक उत्पन्नाचा हिस्सा यासंदर्भातील माहिती जाहिर करण्यात आली. यासंदर्भात जीएमआर कंपनीने एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 10.44 टक्के तर एमआयएएल (जीव्हीके) यांनी एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 12.60 टक्के उत्पन्न देण्याचे मान्य केले.
पात्र ठरलेल्या निविदांवर मुल्यमापन समितीतर्फे अहवाल तयार करण्यात येऊन तो प्रकल्प निरिक्षण व अंमलबजावणी समितीकडे व त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येईल. या संदर्भातील अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळातर्फे घेण्यात येईल.
या प्रक्रियेच्या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य महाव्यवस्थापक (विमानतळ व परिवहन) सोमा विजयकुमार, मुख्य अर्थ सल्लागार वाय. बी. पाटील निविदा सादर करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, सिडकोचे सल्लागार आदी उपस्थित होते.