नवी मुबई, 10 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau:
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे मनमानी कारभार करतात, असा आरोप करीत सर्वपक्षीय नेते आज रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांनी मुंडेविरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग घेत शालेय वस्तूंच्या पुरवठ्याबाबत प्रशासन दाखवित असलेल्या उदासिनतेविषयी नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबईतील पालिका शाळेतील मुलांना पालिकेतर्फे शूज, दप्तर, ड्रेस, रेनकोट आणि पुस्तके देण्यात येतात. परंतु शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना काहीच मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंडे यांनी पर्याय म्हणून या साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक साहित्याबाबत घेतलेला निर्णय तसेच आंबेडकर भवनाच्या कामामध्ये होणारी दिरंगाई यामुळे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज मुंडेंविरोधात रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान, आयुक्त मुंडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्याचे टेंडर गेल्यावर्षी उशिरा काढल्यामुळे गणवेश देण्यास विलंब झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.