मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणासाठी 1.65 हेक्टर राखीव वनजमिनीवरील झाडे तुटणार
स्वप्ना हरळकर/AV News :
नवी मुंबई, 11 फेब्रुवारी 2017:
पशुपक्षांचे आश्रयस्थान असलेल्या पनवेल तालुक्यातील अर्नाळा अभयारण्यावर कुऱ्हाड चालणार आहे. मुंबई –गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान येणारी कर्नाळा अभयारण्यातील 1.65 हेक्टर राखीव वनजमिनीवरील झाडे तोडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हरीत न्यायधिकरणाने या वृक्षतोडीला परवानगी दिल्याची माहिती माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 17 वर पनवेल ते इंदापूर या 84 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रूंदीकरणाअंतर्गत सहा पदरी महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र कर्नाळा अभयारण्य परिसरातील रस्त्याचे काम काहीसे संथगतीने सुरू आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी अभयारण्यातील राखीव वनजमिनीवर असणारी काही झाडे तोडावी लागणार आहेत.
राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने या प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्राच्या सीमेपासून 10 किलोमीटर आतील क्षेत्रावर काम करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. गाभा क्षेत्रातील तीन किलोमीटर परिसरात येणारी जवळपास 450 झाडे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी तोडावी लागणार आहेत. तसेच ही झाडे दुसरीकडे लावण्यात येणार असल्याची माहिती एनएचएआयच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, कर्नाळा अभयारण्यामध्ये सुमारे पावणेदोनशेच्या आसपास विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करतात. हे पक्षी वनातील झाडांवर आपली घरटी बांधतात. रस्ता रुंदीकरणाचे काम करताना शेकडो झाडे तोडावी लागणार आहेत. त्याचा परिणाम पक्षांवर होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.