पनवेल, 11 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उलवा नोडमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. उलवा नोडमधील सेक्टर 19 मधील भूमीपुत्र भवनाच्या समोरील मैदानावर ही सभा होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपाचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रवक्ता मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेसाठी एकूण 44 तर पंचायत समितींकरिता एकूण 90 उमेदवार भाजपा युतीचे आहेत. रायगड जिल्हा व त्यातील पंचायत समिती विभागाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, यासाठी ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवली जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.