एका क्लीकवर मिळणार माहिती
महाराष्ट्रातील पहिला प्रकार
ठाणे 18 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नाही. ठाणे महानगरपालिकेने बनविलेल्या ठाणे वोटर्स सर्च इंजिनमुळे त्यांना आता एका क्लीकवर त्यांच्या नावाची माहिती मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज स्पष्ट केले .
अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी ठाणे महानगरापालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. महापालिकेच्यावतीने आज या सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त(निवडणूक) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी ब-याचवेळा मतदारांस आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची कल्पना नसते. अशा वेळी मतदान केंद्रावर गोंधळ उडू नये यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजिन तयार करण्यात आले आहे.
- नाव कसे शोधाल ?
कोणत्याही मतदारांस http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जावून आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते.या सर्च इंजिनमध्ये मतदाराचे नाव, मतदार संघाचे नाव किंवा मतदान ओळखपत्राचा क्रमांक यापैकी काहीही टाईप केले तरी त्यांची माहिती तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर मतदार असलेल्या व्यक्तींची माहिती, प्रभाग क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक, त्याचा पत्ता अशी माहिती तात्काळ मिळू शकते.