मुंबई, 9 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मुंबई,ठाण्यासह राज्यातील दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुट्टी जाहीर केली आहे.
21 फेब्रुवारीला सुट्टी
मुंबई महापालिकेसह, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
याशिवाय रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या 11 जिल्हा परिषदांकरिता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या 118 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्येही मतदानासाठी 21 फेब्रुवारीला जाहीर सुट्टी घोषित करण्यात आली आहे.मात्र गडचिरोली परिषदेअंतर्गत अहेरी,एठापल्ली, भामरागड व सिरोंचा या 4 पंचायत समिती क्षेत्रापुरतीच ही सुट्टी मर्यादीत राहणार आहे.
16 फेब्रुवारीला सुट्टी
जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हापरिषदांकरिता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत 165 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये मतदानाच्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यातील गडचिरोली जिल्हापरिषदेअंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या 8 पंचायत समिती क्षेत्रापुरती ही सुट्टी मर्यादीत राहणार आहे.