सैन्यदल, नौदल, वायुदलासाठी पूर्व परिक्षा प्रशिक्षण

ncc

मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 फेब्रुवारीला मुलाखती

 मुंबई, 9 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी 14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 40 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2017 रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीस येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंग (PCTC Training)च्या गुगल प्लस पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे संकेतस्थळ www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध चेक लिस्ट आणि महत्वाच्या तारखा (Important Dates) तपासाव्यात. तसेच त्याची दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रता :

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे.

अ)     कंबाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA) उत्तीर्ण व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

ब)      एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप   हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

क)     टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

ड)      University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस  केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांनी केले आहे.