राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती
मुंबई, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी रतन टाटा, आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका आदी उद्योगपतींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
ग्रामीण भागाच्या तुलनेत महानगरपालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते. ते वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहिराती, होर्डिंग पथनाट्य, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य, सोशल मीडिया, कम्युनिटी रेडिओ इत्यादींद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यात विविध उद्योग समूहांनीही सक्रिय सहभागी व्हावे यादृष्टीने आयोगातर्फे सर्व संबंधितांना आवाहन करण्यात आले होते, असे सहारिया यांनी सांगितले.
आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रतन टाटा, आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका यांनी आयोगाच्या कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष चर्चा केली. आपापल्या उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळेची सवलत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. उद्योगसमूहाच्या सर्व ठिकाणी मतदार जागृतीबाबत फलक लावण्यात येतील. त्याचबरोबर इतर काही उपक्रम शक्य असल्यास तेही राबविले जातील, असे या मान्यवरांनी सांगितल्याची माहिती सहारिया यांनी दिली.