मुंबई, 5 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:
निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे एकीकडे वातावरण तापलेले असताना मुंबईसह उपनगरांमध्ये हवेत मात्र आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. दुपारनंतर तापमानात काहीशी घट झाल्याचा अनुभव मुबईकरांनी घेतला. उत्तर-पश्चिम वाऱ्यांचा जोर काहीसा वाढल्यामुळे हा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आज मुंबईत कुलाबा 21.6 तर सांताक्रुझ येथे 19.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. उपनगरांमध्येही हवामानात गारवा जाणवत आहे. पुढील 48 तासांत शहराच्या तापमानात आणखी घट होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
दिवसभर चढे असलेले मुंबई शहराचे तापमान संध्याकाळपासून घसरू लागले आहे. सध्या उत्तर-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्यांचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. या वाऱ्यांमुळे हवेतील तापपामानात घट होवून आल्हाददायक गारवा जाणवत आहे. रात्रीच्या तापमानातही कहीशी घट झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगराचे तापमान18 अंश सेल्सिअसपर्यत खाली येईल तर पुढच्या 48 तासांमध्ये हे तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.