उद्धव ठाकरे यांचा भाजपच्या नेत्यांना टोला
मुंबई, 5 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मुंबई महापालिकेतील आमचा कारभार एकदम पारदर्शक आहे, याचे प्रशस्तीपत्रक केंद्र सरकारनेच दिले आहे. आमची पारदर्शकता राज्यातील नेत्यांना दिसत नाही. मात्र केंद्रात सरकार चालविणाऱ्या त्यांच्या मायबापांना दिसली. आता हे हुतात्मा चौकात जावून पारदर्शकतेची शपथ घेत आहेत. आता आम्हालाही यांची पारदर्शकता पहायची आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना मारला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुंबईतील जाहीर सभा आज भांडुप येथे झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भापजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आलो आहे. सगळीकडे भगवं वादळ आहे. विजय नक्कीच आहे.,असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
अखंड महाराष्ट्र राखण्याची शपथ घेतो
- संयुक्त महाराष्ट्र शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाने उभा राहीला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होवू देणार नाही. विदर्भासोबत अखंड महाराष्ट्र एकत्र ठेवण्याची आम्ही शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचा एक इंचही देणार नाही. हुतात्म्यांनी रक्त देऊन मुंबई मिळवली आम्ही रक्त दान करून मुंबई वाचवतो आहे, असे सांगत आपल्याला मुंबईकर असल्याचे सांगायला लागत नाही तर काही जणांवर आम्हीच खरे मुंबईकर असल्याचे सांगत फिरावे लागत असल्याचाही टोला उद्धव यांनी भाजपला मारला.
- मुंबईच्या विकासाला आम्ही बांधील आहोत. अनेक विकासकामे डोळ्यासमोर आहेत. ती आम्ही पूर्ण करूच, असे सांगत सध्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ झाली आहे. हे संकट केंद्र सरकारने लादलेलं असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना मारला.
- आमच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त करणाऱ्यांनी प्रथम आपला पारदर्शक कारभार दाखवावा. गेल्या अनेक कॅबिनेट बैठकाच झाल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला पारदर्शक कारभार दाखवायचा असेल तर पुढची कॅबिनेट बैठक सगळ्यांसमोर घेवून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना दिले.