प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांचा विश्वास
मुंबई, 5 फेब्रुवारी 2017 / AV News Bureau:
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्षपदे व सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर राहिली. त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपा सर्वाधिक यश मिळवून नंबर वन पार्टी होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांना प्रदेशाध्यक्षांनी शपथ दिली व प्रचाराचा शुभारंभ केला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन करून प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. मुंबई महापालिकेत भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेना व काँग्रेस पक्षाने छुपी युती केली असून एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे केले आहेत. पण त्यांच्या मॅच फिक्सिंगने भाजपाचा पराभव होऊ शकत नाही, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी सांगितले.