काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप
उस्मानाबाद 4 फेब्रुवारी 2017:
भाजप शिवसेना सरकारने दोन वर्षात राज्याचा खेळखंडोबा केला आहे. राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करा असे आवाहान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे .
जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी प्रचाराची सुरुवात शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर येथून करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.मधुकरराव चव्हाण, आ.दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, अशोक पाटील निलंगेकर जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ही निवडणूक सरकारच्या दोन वर्षाच्या कालवधीचे मूल्यमापन करणारी आहे. दोन वर्षाच्या काळात या सरकारने राज्याचा खेळखंडोबा केला आहे. ज्यांना सरकार कसे चालवायचे हे माहित नाही त्यांना या निवडणुकीत लोक निवडून देणार नाहीत त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे असे चव्हाण म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर टीका केली. सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने शेतक-यांना मदत केली नाही. लोक स्थलांतर करत होते. मुकी जनावरे मरत होती. निसर्गाला दया आली, पाऊस पडला. पण या सरकारला मात्र दया आली नाही. नोटाबंदीने जनतेचे प्रचंड हाल झाले. शेतक-यांच्या मालाला भाव नाही. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नोटाबंदीतून जमा झालेल्या पैशातून शेतक-यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यावेळी इतर नेत्यांचीही भाषणे झाली.