मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू
डोंबिवली,३ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
अभिव्यक्तीची माध्यमे बदलली असून शाश्वत मूल्यांची कास न सोडता २१ व्या शतकातील नवीन मुल्यांची सांगड घालून मराठीला ज्ञानभाषा म्हणून समृध्द केल्यास मराठीला खरी प्रतिष्ठा मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील पु.भा.भावे साहित्य नगरीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. आगरी युथ फोरमने या संमेलनाचे आयोजन केले असून ते ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
मराठी ही जगाताली एक प्रमुख भाषा आहे. सुमारे १२ कोटींपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. मराठीने साहित्य क्षेत्राला भरभरून दिले आहे मात्र जगाने या भाषेचे प्रभुत्व मान्य केले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर मराठीतील साहित्य मोठ्या प्रमाणावर अनुवादित होऊन जगभर गेले पाहिजे. आपल्याकडे देखील नोबेलच्या दर्जाचे साहित्य निर्माण करण्याची क्षमता असलेले साहित्यिक आहेत.निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यासंदर्भात अधिक काही जाहीर करता येत नसले तरी पुढील काळात निश्चितपणे यावर ठोस निर्णय घेण्यात येतील आणि साहित्यिकांनी या मंचावरून उपस्थित केलेल्या मराठीविषयक चिंतेची दखल तेवढ्याच गांभीर्याने घेतली जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संवादाची आणि अभिव्यक्तीची माध्यमे बदलली असून मराठीचा उपयोग हा डिजिटल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु होण्याची गरज आहे. चीन, जपान, कोरिया या देशांनी आपल्या भाषांमध्ये तंत्रज्ञानात प्रगती केली, त्यामुळे तंत्रज्ञानाची व ज्ञानाची भाषा देखील मराठीत होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
याप्रसंगी या संमेलनासंदर्भातील “ कणगा” या स्मरणिकेचे तसेच “ भेटी” या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आपले मनोगत व्यक्त करून संमेलनाध्यक्षांची सूत्रे डॉ अक्षयकुमार काळे यांच्याकडे सोपविली. नवे संमेलनाध्यक्ष डॉ काळे यांनी देखील भाषण केले.