मुंबई, 3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी प्रचाराचा शुभारंभ उद्या ४ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी उद्या दुपारी २.३० वाजता उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे राज्यातील प्रमुख नेत्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवाजीराव पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. पतंगराव कदम आ. नसीम खान, आ.मधुकरराव चव्हाण, आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, आ. अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५.१५ वाजता अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे तर रात्री ७.३० वाजता जगदंबा चौक, सोलापूर येथे सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेणार आहेत.