नवी मुंबई, 3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धा 2 व 3 फेब्रुवारीला प्राथमिक फेरी पार पडली. नृत्य स्पर्धेत 700 हून अधिक तर गायन स्पर्धेत 650 हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कलावंताना प्रोत्साहीत करण्यासाठी नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 8 ते 15 वयोगटातील मुले व मुली तसेच 15 वर्षावरील पुरूष व महिला (खुला गट ) अशा दोन गटात गायन व नृत्य कला साकारणारे कलावंत सहभागी झाले आहेत.
प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी गायन स्पर्धेत 8 ते 15 वर्षाखालील गटात चार व 15 वर्षावरील गटात चार अशा वैयक्तिक आठ व सामुहिक आठ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. तसेच नृत्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी 8 ते 15 वर्षाखालील गटात चार व 15 वर्षावरील गटात चार अशा वैयक्तिक आठ व सामूहिक आठ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.
गायन स्पर्धेच्या सोळा व नृत्य स्पर्धेच्या सोळा स्पर्धकांची अंतिम फेरी 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे.