मनसे चित्रपट सेनेचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निवेदन
नवी मुंबई, 1 फेब्रुवारी 2017/ AV News Breau:
नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या समस्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करा आणि २०१४ पासून आतापर्यंत नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरल्या गेलेल्या निधीचा तपशील जाहीर करा अशी मागणी नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेच्यावतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
तत्कालीन नवी मुंबई मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई मनसे शहर शिष्टमंडळाबरोबर जुलै २०१५मध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यावेळी नाट्यगृहाच्या अनेक त्रुटी व दुरावस्था आढळून आल्या होत्या. मनसेच्या या पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासनातर्फे त्यावेळी नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि नव्याने नाट्यगृहासाठी विकास आराखडा सादर करू असे आश्वासन आयुक्त वाघमारे यांनी दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप शहर संघटक श्रीकांत माने यांनी केला आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहाची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असून गरज पडल्यास नाट्यगृह, प्रेक्षक व कलाकारांच्या समस्यांसाठी आंदोलन करण्याचा इशाराही शहर संघटक श्रीकांत माने, उपशहर संघटक प्रसेनजीत भालेराव आणि अनिकेत पाटील यांनी दिला आहे.