मंदावलेल्या गतीला जिद्दीचे पंख

aditi

अदिती वर्मा

एका सर्वसामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. मात्र ही मुलगी सर्वसमान्यांसारखी नव्हती.  इतर मुलांच्या तुलनेत तिची गती काहीशी संथ होती. पण तिचं निर्मळ हास्य साऱ्यांना तिच्या वेगळेपण विसरायला लावत होते. आपल्या पदरात टाकलेली ही सुंदर परी देवाने काहीतरी विशेष कारणासाठीच धाडली असणार या विश्वासावरच त्या कुंटुंबाला बळ मिळालं. कुटुंबाने दिलेल्या बळावर त्या मुलीनं कुटुंबाने दिलेले प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवला. याच विश्वासाच्या जोरावर ही मुलगी म्हणजे आज आपल्या गतिमंदतेवर मात करत बेलापूर इथं स्वतःच कॅफेटेरिया यशस्वीपणे सांभाळत आहे. ही मुलगी आहे अदिती वर्मा.

अदितीचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी तिच्या विकलांगतेविषयी वर्मा कुटुंबाला माहिती दिली. आई-वडील आणि एक मुलगा अशा कुटुंबात अदिती आली होती. आपलं मूल मतिमंद आहे हे कळल्यावर आणि स्वीकारल्यावर ख-या अर्थाने लढाई सुरू झाली. सामान्य मुलांसारखं आपल्या मुलीचं पालनपोषण शक्य नाही याची जाणीव तिच्या आईला होती. मात्र मोठ्या जिद्दीने आईने म्हणजे रिना वर्मा यांनी अदितीला मोठं केलं.

रिना वर्मा सांगतात, आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिकतेची बिजे लहानपणापासूनच अदितीमध्ये रुजत होती. ती तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक गोष्ट आकलन करीत होती आणि मनाशी पक्कीही करीत होती. अर्थातच आमच्यासोबत तिचाही हा प्रवास सोपा नव्हता. घराच्या चार भिंतीत कोणतही मूल सुरक्षितच असतं. मात्र त्याची खरी लढाई सुरू होते ती घराबाहेर पडल्यावरच. त्यामुळे अदितीला जगाच्या रहाटगाड्यात समर्थपणे जगता येईल यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने विशेष प्रयत्न केले.

अदितीच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे सुरूवातीची काही वर्ष देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतर होत होतं. काही वर्ष मेरठ, जयपूर असं करत 2005 साली हे वर्मा कुटुंब नवी मुंबईत स्थायिक झाले. त्या वेळी अदिती खूपच लहान होती. तरिही तिचे बाबा त्यांच्यासोबत तिला ऑफिसमध्ये घेऊन जायचे. ती कामात विशेषतः लोकांमध्ये रमते हे लक्षात आलं. त्यामुळे ती अधिकाधिक स्वावलंबी व्हावी यासाठी तिच्यावर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकू लागलो. आपणही लोकांच्या उपयोगी पडतो, ही बाब नकळतपणे तिलाही सुखावत होती. त्यातूनच ती दिलेले काम अधिक चोखपणे कसे करता येईल, याकडे अधिक लक्ष देऊ लागली.

आम्हालाही आता त्याची सवय झाली होती. त्यामुळे तिने स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेच आहे, असे वाटू लागल्यामुळे तिच्यासाठी अनेक गोष्टींची जुळवाजुळव करू लागलो. 2015 साली बेलापूरच्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानची माहिती मिळाली. आम्हालाही विश्वास वाटल्यामुळे आम्ही अदितीला व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिने स्वमी ब्रम्हानंद प्रतिष्ठानमध्ये एक वर्षाचं व्यवसाय प्रशिक्षण घेतलं. तिचा आवाका लक्षात घेऊन आमच्या लक्षात आळे की, ती एखादा छोटा व्यवसाय करू शकते. तशी क्षमता तिच्यामध्ये असल्याचे आम्हाला कळून चुकले. त्यामुळे तिचं व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण झालं आणि आम्ही तिच्यासाठी छोट्या फूडस्टोअरची कल्पना मांडली. त्यानुसार बेलापूर इथल्या भूमी मॉल मध्ये 2016 साली अदिती कॉर्नर सुरू केलं. यासाठी तिची आई रिना यांनी मुद्रा लोन घेतलं. कारण तांत्रिकदृष्ट्या अदितीला  कर्ज मिळू शकत नाही. मात्र आपल्या लेकीला स्वयंपूर्ण करण्यासाठी ही रिस्क घेणं गरजेचं होतं. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या कॅफेटेरियात अदितीसोबत दोन मदतनीस काम करतात. तिच्या व्यवयायाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नोंद ती ठेवते. त्यासाठी एक चार्ट तयार केला आहे. यामध्ये अगदी पाच रूपयाचाही हिशेब ठेवला जातो अदितीची आई सांगत होती.

सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती कॅफेटेरिया सांभाळते. येणा-या प्रत्येक ग्राहकाशी हिंदी सोबतच इंग्रजीतही संवाद साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला अगदी घरच्यासारखं वाटायला हवं. त्यामुळे कुणाला काय हवं काय नको, याकडे तिचा बारीक कटाक्ष असतो. त्यामुळे लोकही आवर्जून तिच्या फूड मॉलमध्ये येतात. दुकानातील व्यवस्थापन  बघताना तिचा सराईत वावर लोकांना आश्चर्यचकीत करून टाकतो. आपल्या जिद्दीने अदितीही एक नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करतेय.

आईच्या या बोलण्यावर अदितीने सांगायला सुरूवात केली. मी सर्वसामान्य मुलींसारखी नाही.  पण माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलंय. अनेकदा मला घट्ट मिठीत घेऊन ती बसायची. त्यानंतरची माझी आई मला दरवेळी वेगळीच वाटली. माझ्या जिद्दीची ती प्रेरणा होती आणि आहे. त्यामुळे आईसाठी मी उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. त्यामध्ये तुमच्यासारख्या समजूतदार लोकांची साथ हवी असं ती सांगते. आज छोट्याश्या दुकानात सुरू असलेल्या माझा कॅफेटेरिया मला मोठ्या हॉटेलात रूपांतरित करायचा असल्याचं अदिती सांगते.

आपली मुलगी गतीमंद आहे, याचे दुःख न करता तिला तिचा वेळ आणि स्पेस दिला. तिच्यामधील क्षमता विकसित करून त्याची जाणीव तीला करून दिली आणि आज ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच दैनंदिन व्यवहार करते. हे पाहून तिच्या आईवडिलांना घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आपल्या मुलीला सर्वसामान्यांप्रमाणेच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणा-या एका आईची आणि तिच्या या प्रयत्नांना मनापासून साथ देणा-या एका विशेष मुलीची वाटचाल प्रत्येकाला प्रोत्साहन देणारी आहे .

Email : siddharth@aviratvaatchal.com