लातूर, 31जानेवारी 2017:
लातूर एमआयडीसीमधील एका तेलाच्या कंपनीतील टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या 9 कामगारांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्या भावांचाही समावेश आहे.
येथील एमआयडीसी भागात खाद्य तेलाचे उत्पादन करणारी किर्ती ऑइल कंपनी आहे.तेल काढल्यानंतर उरलेला टाकाऊ कचरा एका टाकीत जमा केला जात असे. ही टाकी साफ करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुसार सोमवारी संध्याकाळी तीन कामगार टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. मात्र बराचवेळ झाला तरी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून कंत्राटदार आणि अन्य पाच कामगार टाकीत उतरले. मात्र तेदेखील बराच वेळ टाकीबाहेर आले नाही. त्यामुळे रात्री एका कामगाराला दोरीच्या सहाय्याने टाकीत उतरवण्यात आले. मात्र तेथील परिस्थिती पाहून तो हादरला. टाकीत विषारी वायू असल्याचे लक्षात आल्यानंतंर त्याला तातडीने टाकीबाहेर काढण्यात आले.
परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आल्यानंतर बचावकाम सुरू करण्यात आले. पोकलेनच्या सहाय्याने टाकीचा काही भाग तोडून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यांची तपासणी केली असता सर्व नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. टाकीतील विषारी वायूमुळेच या कामगारांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.