राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे पुस्तक
मुंबई, 31 जानेवारी 2017/AV News Bureau:
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या गेल्या 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ या कॉफी टेबल बूकचे आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, मागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी मोठे कार्य करता आले याचा विशेष आनंद वाटत आहे. राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशा बहुविधतेचा मोठा वारसा असून फक्त देशच नव्हे तर संपूर्ण जग महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टीने पहात आहे. राज्याच्या विकासासाठी या पुढील काळातही आपण सर्वतोपरी योगदान देत राहू. विशेष अधिकाराच्या आधारे मागील साधारण दोन वर्षांच्या काळात राज्यातील आदिवासींसाठी विशेष कार्य करता आले, याचे समाधान वाटते. विद्यापीठांचा कुलपती या नात्याने शिक्षण क्षेत्रातही योगदान देण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील किमान दोन विद्यापीठे ही जगातील सर्वात्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत, असे ते म्हणाले. राज भवन परिसरात आपल्या कालावधीत शोध लागलेल्या बंकरच्या ठिकाणी महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडेल असे संग्रहालय उभे करण्याचा मानस असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.