मुंबई, 30 जानेवारी 2017/AV News Bureau:
वैद्यकीय उपकरणांच्या वापराबाबत रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील आठ रुग्णालयांवर वैध मापन शास्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गत नियमांतील तरतुदी भंग केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बलून डिव्हाईस, अँजोग्राफिक कॅथेटर, आयवी कॅथेटर यासारखी पॅकबंद उपकरणे आणि वस्तूंवर छापील किमती तसेच माहितीमध्ये खाडाखोड करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. याप्रकरणी विशेष पोलीस महासंचालक अमिताभ गु्प्ता यांच्याशी संपर्क शाधला असता संबंधित रुग्णालयांची चौकशी करण्यात येत असून ब्रीच कॅंडी या रुग्णालयावरही कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर वैध मापन शास्त्र अधिनियमानुसार माहिती न छापणे व अशा वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विशेष मोहिम राबवून मुंबईतील रुग्णालयांवर मापन शास्त्र यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
कारवाई केलेली रुग्णालये
- बांद्रा येथील लीलावती हॉस्पिटल व एशियन हार्ट इन्स्टिट्यूट
- मुलुंडमधील फोर्टिज हॉस्पिटल
- अंधेरीतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल
- परळमधील ग्लोबल हॉस्पिटल
- पवईतील हिरानंदांनी हॉस्पिटल व सर एच.एन. हॉस्पिटल (रिलायन्स फाऊंडेशन)
कारवाईत काय आढळले
रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या बलून डिव्हाईस, अँजोग्राफिक कॅथेटर, युरेटिक युरोवर्ल्ड, फॅब्रिक नॅचरल फायबर, आयवी कॅथेटर, गाईड वायर, ब्रेथिक सर्किट, लिंबो सिंगललिम अनेथेसिया, हॅनसन ग्लोज, ब्लड कलेक्टर आदी आवेष्टित (पॅकबंद) वस्तूंवर वैधमापन शास्त्र अधिनियमानुसार माहिती छापली नसल्याचे आढळून आले. तसेच रुग्णालयांमधील वजनमापांची पडताळणी व मुद्रांकन न केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.
ब्रीच कॅंडी रुग्णालयातही आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शस्रक्रियेसाठी वापरली जाणारी 7 आणि औषधांची 3 उत्पादने जप्त करण्यात आली. याशिवाय स्टेंट्सच्या व्यवहारातही अनियमितता आढळून आली असून तीन वितरकांची बिले सापडली आहेत. याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या पॅकबंद साहित्यांवर घोषित किमत व रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या दरातील तफावतीसंबंधीची तपासणी वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून करण्यात येत आहे. छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारून रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून ग्राहकांनी अशा प्रकाराविरुद्ध जागरुक रहावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.
याबाबत तक्रार असल्यास वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षात 022-22886666 या क्रमांकावर अथवा ई-मेल dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmmumbai@yahoo.in, dyclmkokan@yahoo.in, dyclmnashik@yahoo.com, dyclmpune@yahoo.in, dyclmaurangabad@yahoo.in, dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.