मुंबई, 29 जानेवारी 2017/AV News Bureau:
मुंबई काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी आपल्या समर्थकांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अंधेरी भागात चांगलाच दबदबा असणाऱ्या देवेंद्र आंबेरकर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. शिवसेना-भाजप यांची तुटलेली युती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडीवरून सुरु असलेले मतभेद, यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे. या सर्व धामधुमीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. संजय निरुपम आणि गुरूदास कामत यांच्यातील संघर्ष चांगलाच विकोपाला गेला आहे.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आधी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसमधून भाजप प्रवेश केला तर आता आंबोली विभागातून ज्येष्ठ नगरसेवक असलेले आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेसला दुसरा धक्का दिला आहे.
मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आंबेरकर यांनी चांगलाच ठसा उमटवला होता. मात्र त्यांना हटवून प्रवीण छेडा यांची नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आंबेरकर चांगलेच दुखावले होते. आता महापालिका निवडणुकीत आंबेरकर पूर्ण ताकदीनीशी उतरणार असल्यामुळे शिवसेनेला त्याला फायदा होईल, असे बोलले जात आहे.