राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा आरोप
मुंबई, २८ जानेवारी 2017/AV News Bureau:
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या राजकीय आयुष्याचा श्रीगणेशा ज्या पक्षात झाला आणि राजकीय कारकिर्द ज्या पक्षामुळे घडली, त्या पक्षाच्या उपकाराची परतफेड करण्यासाठीच निरुपम आघाडीत बिघाडी करण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे.
निरूपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. निरुपम यांना मुंबईचे मतदार त्यांची जागा दाखवून देतीलअसेही अहिर म्हणाले.
निवडणुका घोषित होण्याआधी आघाडीसाठी पोषक वातावरण असतानाच निरूपम यांनी आघाडीबाबत उलटसुलट विधाने करण्यास सुरूवात केली. महापालिकेतील युतीच्या कारभाराला मुंबईकर कंटाळले आहेत. त्यातच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यात आम्हाला यश आल्याने महापालिका निवडणुकीत युतीला धूळ चारण्याची नामी संधी यंदा चालून आली होती. ही बाब हेरून राज्यातील इतर महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही झाली आहे. मात्र फक्त निरुपम यांच्या आडमुठेपणामुळे मुंबईत आघाडी आकाराला येऊ शकली नाही. निरूपम यांच्या उलटसुलट वक्तव्यांमुळे आणि आघाडीबाबतच्या उदासिनतेमुळे मुंबईत राष्ट्रवादीने स्वबळावर लढणे पसंत केल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या २६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर