राजपथावरील चित्ररथ पथसंचलनाचा निकाल जाहीर
नवी दिल्ली, 28जानेवारी 2017/AV News Bureau :
लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित `बाळ गंगाधर टिळक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राजपथावरील चित्ररथ पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला असून अरूणाचल प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम तर त्रिपुराच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावर्षी राजपथावर 17 राज्यांचे आणि 6 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले होते. अरूणाचल प्रदेशच्या वतीने राजपथावर ‘याक नृत्य’ प्रदर्शित करण्यात आले होते. त्रिपुराच्या चित्ररथाच्या माध्यमातून ‘रियांग’ हे आदिवासी नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते.
- चित्ररथाची गौरवशाली परंपरा कायम
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपराआहे. 1980 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या चित्ररथास तसेच 1983 मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता.
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी 1993 ते 1995 असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळवून दिला.
1986 मध्ये ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. 1988 मध्ये राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला’ यास दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.
2007 मधे ‘जेजुरीचा खंडेराय’ या चित्ररथास तृतिय तर 2009 मधे ‘धनगर’ या चित्ररथास तृतिय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.
2015 मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राने राजपथावरील चित्ररथांची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.