नवी मुंबई, 27 जानेवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर तातडीचे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारी 30 जानेवारी रोजी शहराच्या काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
1700 मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील तातडीच्या दुरुस्ती हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने सकाळी 11.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी शट डाऊन घोषित केला आहे. यामुळे जुईनगर, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये होणारा पाणी पुरवठा शटडाऊनच्या कालावधीत बंद राहील. काम पुर्ण झाल्यानंतर कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.