युती तुटल्याने काँग्रेसचा विजय सुकर

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई, 27 जानेवारी 2017/AV News Bureau:

शिवसेना-भाजपची बेगडी युती तुटल्याने आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

उध्दव ठाकरे यांनी युती तोडण्याच्या वल्गना करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे. उध्दव ठाकरे म्हणाले की आता युती करण्यासाठी कुणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही म्हणजे यापूर्वी उध्दव ठाकरे हे कटोरा घेऊन उभे होते हे स्पष्ट झाले असून शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे , अशी टीका चव्हाण यांनी केली.

निवडणुकीची गणिते जुळत नाहीत म्हणून वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीतनंतर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचे ही शिवसेना भाजपची कार्यपध्दती आहे. विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या युती नाट्याचे प्रयोग राज्यातील जनतेने पाहिले आहेत. मुंबई महापालिकेत गेल्या 22 वर्षात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून युती तोडून तो झाकला जाणार नाही. जनतेमध्ये शिवसेना भाजप विरोधात तीव्र असंतोष असून आगामी निवडणुकांत काँग्रेसचा विजय निश्चित होताच तो आता अधिक सुकर झाला आहे, असे  चव्हाण म्हणाले.