शिवसेना-भाजपचा काडीमोड

राज्यात कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई, २६ जानेवारी २०१७/AV News :

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या शिवसेना-भाजप युतीचा निकाल लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती करणार नसल्याचे सांगत राज्यात भाजपशी काडीमोड घेतल्याचे आज जाहीर केले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गोरेगाव येथे शिवसेनेची आज सभा होती. या सभेमध्ये उद्धव ठाकरे युतीच्या भवितव्याबाबत घोषणा करणार असल्यामुळे साऱ्यांचेच लक्ष लागले होते.  अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपच नव्हे तर कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेली २५ वर्षे भाजपशी असलेली युती अखेर संपुष्टात आली आहे.

शिवसेनेने युती न करण्याचे जाहीर केल्यामुळे आता मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार होईल,यात शंका नाही.

गोरेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. घरात घुसून जर मारणार असाल तर काय पंचारती करू, असा सवाल करीत सत्तेसाठी कुणापुढेही झुकणार नाही. सत्ता नशिबात असेल तर ती मिळेलच. शिवसैनिकांनो तुमची वज्रमूठ द्या, मी समोरच्यांचे दात पाडून टाकतो, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्रावर शिवसेना एकट्याने भगवा फडकावेल, असे भावनिक आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई महापालिकेतील 2012 मधील दोन्ही पक्षांचे संख्याबळ

शिवसेना-  75

भाजप -31