मुंबई, 25 जानेवारी 2017/AV News Bureau:
जर्मनमधील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे मुख्यमंत्री विन्फ्रेड केचरमन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही राज्यांत विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यास उत्सुकता दाखविली.
बाडेन वुर्टेमबर्ग राज्याचे मुख्यमंत्री केचरमन हे शिष्टमंडळासह महाराष्ट्राच्या भेटीवर आले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात बाडेनचे अर्थ, कामगार व गृहनिर्माण मंत्री डॉ. निकोल होफमिस्टर, परिवहन मंत्री विन्फ्रेड हेरमन, राज्यमंत्री क्लाऊस पिटर मुरावस्की, राज्याचे सचिव पेट्रा ओलाचोवस्की आदींचा समावेश होता.
महाराष्ट्र हे भारतामधील एक प्रगत औद्योगिक राज्य आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील 15 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. तसेच देशाच्या 35 टक्के औद्योगिक उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होत असून निर्यातीतही हे राज्य आघाडीवर आहे. राज्यात चारशेहून अधिक जर्मन कंपन्यांचे प्रकल्प आहेत. पुण्यामध्ये अनेक जर्मन कंपन्यांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. राज्याच्या विकासात या कंपन्यांचे मोठे योगदान आहे. बाडेन वुर्टेमबर्ग आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत. तसेच दोन्ही राज्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर्मन शिष्टमंडळाला दिली.