महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई 24 जानेवारी 2017:
आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
आज टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायती निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवर चर्चा झाली.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन जातीयवादी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद असू शकतात. गटबाजी नाही. हे मतभेद चार भिंतीमध्ये सोडवले गेले पाहिजेत. गुरुदास कामत आणि संजय निरूपम यांच्यातील मतभेदाबाबत पक्ष श्रेष्ठींनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपींदर हुड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. लवकर ते या नेत्यांशी चर्चा करतील आणि मतभेद दूर होतील, असे चव्हाण यांनी सांगितले.