नवी मुंबई, 23 जानेवारी 2017/AV News Bureau:
नवी मुबंई महानगरपालिकेतील अत्यावश्यक व दैनंदीन स्वरूपाची कामे कंत्राटी पध्दतीवर करून घेण्यात येत आहे. या सर्व कंत्राटी कामगारांची महापालिकेच्या सेवेत कायम करावे आणि समान कामाला समान वेतन धोरणातील त्रुटी दूर करावी आदी मागण्यांसाठी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून 23 ते 25 जानेवरी या काळात महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान फेरीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून कंत्राटी कामगारांनी काळ्या फीती लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे.
पालिके मार्फत राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियान फेरीदरम्यान पाहणीदौरा करण्यास दिल्लीहून विशेष भरारी पथक येणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी काळ्या फीती लावून कामे करणार आणि पालिकेच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिली.
27 जानेवारीला होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घेतली नाही तर 28 जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा समाज समता कामगार संघातर्फे देण्यात आला आहे.