मुंबई, 23 जानेवारी 2017/AV News Bureau:
मध्य रेल्वेच्या मशिद बंदर आणि सॅंडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान संरक्षक भिंतींना लागून असलेल्या झोपड्यांना आज सायंकाळी मोठी आग लागली. आगीचे लोळ रुळांवर येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जलद मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. ऐन गर्दीच्यावेळी ही घटना घडल्यामुळे कामावरून घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या मशिदबंदर रेल्व स्थानकालगतच्या संरक्षक भिंतीजवळ असणाऱ्या झोपड्यांना ही आग लागली. आग भडकल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून जलद मार्गावरचा विद्युत पुरवठा सायंकाळी 6.15 ते 7.15 या काळात बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. मात्र साडेसातनंतर हळूहळू जलद मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे वाहतूक हळूहळू सुरू आहे. आग विझवण्याचे काम सुरू असून वायरहेडला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सायंकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.