संतोष गवस
खांदेश्वर, पनवेल
पक्ष- प्रहार विद्यार्थी संघटना
संघटक, महाराष्ट्र राज्य
मुंबईतल्या गोवंडी भागातील बैंगणवाडीमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहान असतानाच वडील वारले. त्यामुळे आजीच्या मायेखाली बालपण गेले. आजी आणि आईने अत्यंत कष्टाने लहानाचे मोठे केले. दहावीपर्यंतचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. त्यानंतर एबीएन एम्रो बँकेत क्लार्क म्हणून नोकरी केली. नोकरी करत असतानाच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान जिथे राहत होतो, तेथेच सामाजिक प्रश्नांची जाणीव होवू लागली आणि बैंगणवाडीत मित्रांसोबत सर्वधर्म समभाव ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपमार्फत स्थानिक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शिक्षणाचं महत्व तर माहित होतचं. स्वतः कष्ट करून शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे शिकताना येणा-य अडचणींची जाणीव होती. वस्तीतल्या मुलांना मात्र चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी आम्ही वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप क्लासेसची स्थापना केली. क्लासेसमधूनच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची जाणीव झाली.
वस्तीतून बाहेर पडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने समाजवादी विचारसरणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेत गोवंडी अध्यक्ष या पदापासून सुरुवात केली. छात्रभारती विद्यार्थी संघटनेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर संघर्षात्मक आंदोलनाचे नियोजन व सक्रीय सहभाग घेत राहिलो. प्रसंगी इतर आंदोलकांसोबत तुरूंगवासही सहन केला.
शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या काळात ११ वीला मराठी विषयाला आय.टी. चा पर्याय देण्याच्या निर्णयाला विरोध केला. यासंदर्भात प्रत्येक महाविद्यालयात निषेध आंदोलन, मंत्रालयात घुसून मंत्र्यांच्या केबिन बाहेर आंदोलन, आझाद मैदानात धरणे व मंत्री महोदयांची महाआरती आदी आंदोलनांची मालिकाच केली. शिक्षणावरील खर्चात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री १२ वाजता ५०च्या वर विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले. या आंदोलनात एक रात्र तुरूंगवासही भोगला. फार्मसी व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ४०० ते ५०० विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापीठाच्या अधिसभेत जावून जाब विचारला. या आंदोलनामुळे विदयार्थ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. या आंदोलनात ४ दिवस आर्थररोड जेलमध्ये काढावी लागली.
यादरम्यानच बँकेची नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याला वाहून घेतले. या निर्णयामुळे घरात वाद झाले. घरातील अडचणी व वादामुळे अनेक रात्री चर्नीरोडच्या स. का. पाटील उद्यानात काढल्या. डोक्यात सामाजिक प्रश्नांवर एक चळवळ उभारावी असे मनोमन वाटत होते. सामाजिक चळवळीचा लढा सुरू असतानाच आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन चळवळीशी निगडित असलेली कार्यकर्ती शितल जुवाटकर हिच्याशी “सत्यशोधक विवाह” पद्धतीने लग्न केलं. सामाजिक चळवळीत असताना अण्णा हजारे यांचे मुंबईतील आंदोलन , मेधाताई पाटकर यांचे मुंबईतील आंदोलन अशा विविध आंदोलनाच्या निमित्ताने चळवळींमध्ये अधिक सक्रीय होत गेलो.
समाजकार्याला राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेलो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नेमणूक आणि कोकण विभागाची जबाबदारी देण्यात आली.सुरुवातीच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी विविध बैठका व संघटन बांधणीचे कार्य केले. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी विभागातील विविध सुविधांसाठी रत्नागिरीत आंदोलन केले. डी एड च्या विद्यार्थ्यांना शिक्षण सेवक पदावर नियुक्त करण्याच्या मागणीसाठी १०० च्या वर विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड चे CEO यांना घेराव घातला. या प्रकरणात ६७ विद्यार्थ्यांना शिक्षण सेवक पदावर रुजू करून घेतले. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी डी टी इ कडे वेळोवेळी निदर्शने, आंदोलन केली. नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेणाऱ्या अनेक शाळांसमोर आंदोलन करून त्यांच्याविरोधात शासनाला कारवाई करण्यास भाग पाडले आणि किमान १०० विद्यार्थ्यांचे विना डोनेशन प्रवेश करून दिले.
कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला, या आंदोलनामुळे शिक्षकाला शिक्षा झाली.
पनवेल तालुक्यात स्कूलबसना वेळोवेळी होणाऱ्या अपघातप्रकरणी शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करण्यासाठी शिक्षण अधिकारी, आर टी ओ यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले. वेळोवेळी आंदोलने, भरारी पथक स्थापन केले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या आदी शालेय वस्तू वाटप करण्याचे कार्यक्रम राबवले. कामोठ्यातील विविध सोयीसुविधांसाठी आंदोलने करून शहरात पोलीस ठाणे, बस सेवा गार्डन, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र यादी सुविधा मिळवल्या.
प्रहार संघटनेत प्रवेश
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. याच प्रवासात मनसेतून बाहेर पडत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेशी जोडला गेलो. कडू यांनी दिल्ली येथे काढलेल्या किमान ५००० अपंग बांधवांच्या मोर्चाच्या नियोजनाची संधी मिळाली. बेरोजगार युवकांची फसवणूक असो वा महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या असो. वेळोवेळी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून अथवा अनेकदा अहिंसक मार्गाने आंदोलने करून प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर देत आहोत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता एक कार्यकर्ता म्हणून समाजहितासाठी सतत प्रयत्नशील राहणे, यावर माझा विश्वास आहे.
समाजकारण आणि राजकारण करताना कुटुंबाकडे लक्ष देणेही तेवढेच महत्वाचे आहे. राजकारण आणि समाजकारण आपला व्यवसाय नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. सध्या ट्रू इलेक्ट्रॉनिक्स नावाने टीव्ही, फ्रीज आदी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना लोकांच्या उपयोगी पडतो, ही बाब मनाला समाधान देणारी आहे .
संतोष गवस
संपर्क -7738089666