भुवनेश्वर, 22 जानेवारी 2017:
जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसला झालेल्या अपघातात 32 प्रवासी मरण पावले तर 50 हून अधिक जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आंध्रप्रदेशमधील कुनेरू रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री 11 च्या सुमारास इंजिन आणि आठ डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडल्याचे समजते.
अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्रालयाकडून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर अपघातातील जखमींना 25 हजार आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचं रेल्वेने जाहीर केले आहे. या अपघातातील मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.