नवी दिल्ली, २१ जानेवारी 2017:
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
छावनी भागातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन झाले. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे २०६८ कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाचे समजण्यात येणा-या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील १४४ एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील २३ कॅडेट्सची निवड झाली आहे.
राज्यातील ११५ एनसीसी कॅडेट्स १ जानेवारी पासून या शिबीरात दाखल झाले आहेत. यातील २३ कॅडेटसची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी तर ५ कॅडेट्सची राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकामध्ये निवड झाली आहे. २८ जानेवारीला होणा-या पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी ५० एनसीसी कॅडेटसची निवड झाली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आदी गणमान्य व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी ११ कॅडेट्सची निवड झाली आहे तर गणमान्य व्यक्तींच्या भेटी दरम्यान एनसीसीच्यावतीने सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १४ कॅडेट्सची निवड झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख कर्नल एस. गणपती यांनी दिली.
शिबीरात सहभागी महाराष्ट्राच्या संघातील एकूण ११५ कॅडेटस पैकी ७८ मुले तर ३७ मुली आहेत. त्यातील १६ कॅडेट्स हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरीत ९९ कॅडेटस हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यासाठी राज्यातील निवड झालेल्या २३ कॅडेट्समध्ये १४ मुलांचा तर ९ मुलींचा समावेश आहे. राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकामध्ये निवड झालेल्या ५ कॅडेट्स मध्ये ३ मुलांचा आणि २ मुलींचा समावेश आहे.